

Goa government reshuffle latest news update
पणजी : गोवा मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार अशी चर्चा गेली दोन वर्षे सुरू आहे, शेवटी आता पावसाळी अधिवेशनानंतर चतुर्थीपूर्वीपुर्वी हा फेरबदल होण्याचे शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीला गेले असून भरतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासोबत त्यांनी चर्चा करून कायदा व पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना राजिनामा देण्याची सुचना केल्याचे कळते. त्यानुसार आज (दि.२०) सिक्वेरा राजीनामा देणार आहेत.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचा राजीनामा यापूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेला आहे. आता आजारी असलेले कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा हे आज बुधवारी संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याचे मिळत आहेत. त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन जागी विद्यमान सभापती रमेश तवडकर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे कळते.
2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या ११पैकी ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यातील काही आमदारांना मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार निलेश काब्राल यांना वगळून आलेक्स सिक्वेरा यांना लगेच कायदा व पर्यावरण मंत्री करण्यात आले होते. मात्र इतरांना मंत्रीपद दिले गेले नव्हते. शेवटी आता आणखी एक फुटीर आमदार दिगंबर कामत यांना मंत्रीपद दिले जाणार असल्याचे कळते.
कळंगुटचे आमदार व ज्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ८ आमदार फुटले होते ते तत्कालीन विरोधी पक्षनेते राहिलेले मायकल लोबो हेही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना मंत्री करण्यासाठी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार आहे. तो मंत्री कोण ? हा प्रश्न उपस्थित होत असून सध्या तरी तवडकर व कामत या दोघांनाच चतुर्थीपूर्वी मंत्री करण्यात येणार आहे. तवडकर यांच्या जागी सभापती म्हणून सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची निवड होणार आहे . तवडकर व गावकर हे दोन्ही आमदार आदिवासी (एसटी) समाजाचे आहेत.