

पणजी : कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांभाळत असलेल्या ‘आदिवासी कल्याण’ खात्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री गावडे यांच्यावर कारवाई होणार, अशी जोरदार चर्चा सुरूच आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका केंद्रीय नेतृत्वाला कळवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळात नक्की कोणत्या स्वरूपाचा फेरबदल होणार हे स्पष्ट झालेले नाही. मंत्री गावडे यांच्यासह अन्य काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी नव्या आमदारांना मंत्रिमंडळात संधी जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले असून, प्रदेशाध्यक्षांचाही मोबाईल फोन ‘स्विच ऑफ’ होता.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळात फेरबदल होतील, याबाबत चर्चा सुरू आहे; मात्र त्या केवळ चर्चाच आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेस पक्ष फुटून आठ आमदारांचा गट भाजपमध्ये दाखल झाल्यापासून यातील काही आमदारांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, आणि तितक्याच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल असा कायास आहे. मात्र याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. आता मंत्री गावडे यांच्या निमित्ताने मंत्रिमंडळातील फेरबदलाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. त्यांच्यासह अन्य काही मंत्र्यांना वगळून काही आमदारांना मंत्रिमंडळात घेतले जाणार असल्याची चर्चा आहे.
यामध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आमदार संकल्प आमोणकर, डॉ. गणेश गावकर यांच्या नावाची चर्चा आहे. याबरोबरच सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेऊन नव्या आमदाराला सभापतिपद देण्यात येईल, याबाबतही चर्चा सुरू आहे. याबाबतचे अंतिम निर्णय मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, कोअर कमिटी आणि केंद्रीय नेतृत्वामध्ये एक मताने निर्णय होईल असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे गुरुवारी मंत्री गावडे आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यात होणारी चर्चा संध्याकाळी उशिरापर्यंत झालेली नव्हती. या चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल, अशीही माहिती आहे. उद्या शुक्रवारी घटक राज्य दिन असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी व्यग्र आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदल झाले तर ते शनिवार नंतरच होतील, अशी माहिती आहे.
गुरुवारी दिवसभर राज्यात मंत्रिमंडळातील फेरबदलांविषयी जोरदार चर्चा सुरू होत्या. याबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना विचारले असता, त्यांनी याबाबत मौन पाळले आहे. याशिवाय मंत्री गावडे यांनाही याबाबत विचारले असता त्यांनीही कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हे मौन नक्की कशामध्ये रूपांतरित होईल, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.