

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे राज्य सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत 'ऑल गोवा बस ओनर्स असोसिएशन'ने आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रश्न न सुटल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू, असा थेट इशारा असोसिएशनने दिला आहे.
म्हापसा येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी खासगी बस चालकांच्या विविध समस्या मांडल्या. 'माझी बस' योजना, एआय आधारित वाहतूक कॅमरे, बस मार्गांवधील बदल आणि इलेक्ट्रिक बसेस यामुळे खासगी बस मालकांना मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही वाहतूक खात्याचे अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मे २०२५ मध्ये जाहीर झालेली 'माझी बस' योजना अद्याप पूर्णपणे लागू झालेली नाही; तसेच १५ वर्षांची वयोमर्यादा, सक्तीचे डिजिटल तिकीट व महसूल वाटप यावरून चालकांमध्ये नाराजी आहे. अटलबिहारी वाजपेयी सेतू आणि पर्वरी उड्डाणपुलाच्या कामामुळे चालकांना त्रास सहन करावा लागतो. सरकारने १० हजार रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.