

पणजी : नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच सोमवारी कळंगुट येथे 20 पर्यटकांना समुद्रात जलसफरीसाठी घेऊन गेलेली बोट समुद्रात आलेल्या मोठ्या लाटेमुळे उलटली. यात मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सूर्यकांत रामभाऊ पोफळकर (45) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील 12 जणांसह अन्य पर्यटकांना वाचविण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली.
नाताळाची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटकांचे आगमन होत आहे. मंगळवारी 25 रोजी सकाळी कळंगुट समुद्रात पर्यटकांना समुद्र सफरीसाठी एक बोट पर्यटषकांना घेवून गेली होती. मात्र, ही बोट किनार्यांपासून काही अंतरावर आलेल्या मोठ्या लाटेत उलटून बुडाली. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बोटीत सुमारे 25 पर्यटक जलसफरीसाठी गेले होते. यात सध्या रा. कुर्ला-मुंबई व मूळ रा. खेड जि. रत्नागिरी येथील 13 जणांचे कुटुंबीय होते. बोट उलटल्यानंतर समुद्रकिनार्यावरील जीवरक्षकांनी दुपारपर्यंत 13 पर्यटकांना बाहेर काढले. त्यातील सूर्यकांत पोफळकर (45) यांचा बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या 12 पर्यटकांपैकी 8 पर्यटकांना सुरूवातीला कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील एका तेरा वर्षीय लहान मुलांसह पाचजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.
मृत पोफळकर यांची पत्नी सारिका पोफळकर यांनी कळंगुट पोलिस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार, जलसफरीसाठी जाताना दोन मुलांना लाईफ जॅकेट दिले नव्हते. या दुर्घटनेत त्यांची आई, लहान मुलगी, बहीण व भाऊ यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांचेवर पुढील उपचार सुरू आहेत.