

मडगाव ः मागील आठवड्यात अचानक झोपडीला आग लागून निराधार झालेल्या श्रीमती भंडारी यांच्या मदतीसाठी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मदतीचा हात दिला आहे. कार्यकर्त्यांसमवेत मंत्री फळदेसाई यांनी स्वतः बांधकामात हातभार लावल्यामुळे भंडारी यांना निवारा मिळणार आहे.
मागील आठवड्यात श्रीमती भंडारी यांची झोपडी सिलिंडर स्फोटात बेचिराख झाली होती. श्रीमती यांच्या पतीचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले असून विलियण भाटी येथे कृष्णा भंडारी यांच्या घराशेजारी ती व त्यांची मुलगी तेजा हे दोघेही झोपडीत राहत होत्या. वयाची सत्तरी पार केलेल्या श्रीमती या आपल्या आजारी मुलीला पोसण्यासाठी लोकांच्या घरी धुणी-भांडी करून आपला चरितार्थ चालावतात. मुलगी तेजा ही जन्मापासून आजारी असल्याने तिच्या औषधोपचाराचा खर्चही श्रीमती यांनाच उचलावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्यासह दैनंदिन वापराच्या वस्तू आणि कागदपत्रे जळाली आहेत. दुर्घटना घडली त्या रात्री कृष्णा भंडारी यांच्या घरी झोपायला गेली होती. त्यांचा जीव वाचला. नवीन घर उभारण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी लोकांकडे मदतीची याचना केली होती. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दोघींशी चर्चा करून घर उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. श्रीमती भंडारी यांनी मंत्री फळदेसाई यांचे आभार मानले आहेत. मागील चार दिवसांपासून श्रीमती यांच्या नवीन घराचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून देण्याच्या अनुषंगाने फळदेसाई स्वतः त्या ठिकाणी काम करत असल्याचे दिसून आले.