

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन हंगाम सुरू होताच पर्यटकांची संख्या वाढली असून, सप्ताहाअखेरीस ती दुप्पट-तिप्पट होत आहे. संध्याकाळच्या वेळी बहुतांश पर्यटक वाहने घेऊन किनारी भागात जात असल्याने कळंगुट, बागा, कांदोळी, हणजूणेसह कोलवा, पाळोळे किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तासनतास कोंडीत अडकावे लागत असल्याने पर्यटकांसह स्थानिकांचेही हाल होत आहेत.
शनिवार-रविवारी संध्याकाळनंतर किनारी भागात पर्यटकांच्या गर्दीमुळे संपूर्ण पर्यटन पट्ट्यात वाहतूक कोंडी झाली. पर्यटकांची खासगी वाहने, भाड्याची वाहने, टॅक्सी आणि बसेसने रस्ते खचाखच भरले होते. पर्यटन हंगामाच्या पहिल्याच मोठ्या सप्ताहाअखेरीस वेरे, नेरुल, पिळर्ण, पर्रा तसेच कळंगुट-कांदोळी समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्रवासी आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, बहुतांश चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले नव्हते. केवळ बागा सर्कलजवळ काही वाहतूक पोलिस ताबा घेताना दिसत होते. वाहतूक कोंडीमुळे स्थानिकांना घरी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.