

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०१२ पूर्वी गोव्यात वारंवार सरकारे बदलत होती. मात्र, २०१२ मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेली १४ वर्षे गोव्याला स्थिर सरकार लाभले. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे 'डबल इंजिन' सरकार असल्यामुळे गोव्याचा भरीव विकास झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा विधानसभा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात पर्वरी येथे मंगळवारी ते बोलत होते. ते म्हणाले, गोवा १४ वर्षे उशिरा मुक्त झाला. तो १९४७ मध्ये मुक्त झाला असता, तर गोवा याहूनही अधिक विकसित झाला असता, असे सावंत म्हणाले.
गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही, ही चांगली गोष्ट झाली; अन्यथा आपल्यासारख्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नसती, असे सांगत त्यांनी पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात गावागावांत शाळा व रुग्णालये उभी राहिल्याचे नमूद केले. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात गोव्याचा चेहरामोहरा बदलला, असे ते म्हणाले.
अनेक जण प्रथम मंत्री किंवा मुख्यमंत्री होतात आणि नंतर सभापती होतात; मात्र आपण सभापती झाल्यानंतर मुख्यमंत्री झालो, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या विकासासाठी भरीव सहकार्य केल्याचे सावंत म्हणाले.
आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सर्व सरकारांनी गोव्याच्या विकासात हातभार लावला आहे. मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेल्या सामाजिक कल्याणकारी योजना समाजाच्या विकासासाठी लाभदायक ठरल्या असून त्या आजही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटक आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित आहेत.
शेजारील राज्यांशी असलेले संबंध अधिक दृढ झाले पाहिजेत. शेजारील राज्यांशी संदर्भाबद्दल बोलताना त्यात म्हादईच्या मुद्द्याचाही समावेश होतो, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
यावेळी टपाल तिकीट, पाकीट आणि स्मरणिकेचे अनावरण करण्यात आले. जनमत कौल जिंकल्यामुळे गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम राहिले.
राज्याचा दर्जाही काँग्रेसच्या काळात मिळाला आणि विकासाला चालना मिळाली. विकास करताना गोव्याच्या क्षमतेचा विचार प्रत्येक सरकारने करावा. गोवा विधानसभेचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्यावरच तहकूब करणे अनुचित आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
आमदार म्हणून २५ वर्षे पूर्ण केलेले:
सुभाष शिरोडकर, माजी उपसभापती : उल्हास अस्नोडकर, आलेक्स सिक्वेरा, मायकल लोबो, सुभाष फळदेसाई, जोशुआ डिसोझा, मावीन गुदिन्हां, नरहरी हळदणकर, प्रकाश वेळीप, शंभू भाऊ बांदेकर, चंद्रकांत चोडणकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.