

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आम्ही शेवटची विधानसभा निवडणूक लढवणार आहोत, त्यामुळे आम्हाला पक्षाने उमेदवारी द्यावी आणि मतदारांनी निवडून द्यावे. राज्यातील काही ज्येष्ठ राजकीय नेते मतदारांना आणि आपल्या पक्षालाही अशी आर्त विनवणी करताहेत. या ज्येष्ठ इच्छुकांमध्ये अनेकवेळा निवडून आलेले किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा आमदार आहेत.
यामध्ये माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हे मांद्रेतून पुन्हा एकदा शेवटची निवडून लढवू इच्छितात, कारण २०१७ मध्ये त्यांचा मुख्यमंत्री असताना पराभव झाला होता. तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मांद्रेतून निवडून यायचे आहे आणि आपल्या मागे लोक आहेत हे दाखवायचे आहे.
पक्षाने संधी दिली तर आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. मांद्रत दयानंद सोपटे भाजप उमेदवारीचे प्रमुख दावेदार मानले जातात. नुवे मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री आलेक्स सिक्चेरा २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांत इतर सात आमदारांसह भाजपमध्ये दाखल झाले. आलेक्स सिक्वेरा यांचेही हेच म्हणणे आहे.
आपली ही शेवटची निवडणूक असून भाजपने आपल्याला उमेदवारी दिली तर आपण निश्चितपणे ती लढवण्यास तयार आहे. फुटिरांना उमेदवारी देणार नाही, असे काँग्रेसने आलेक्स सिक्वेरा जाहीर केलेले असल्यामुळेच सिक्वेरा यांची भाजपच्या उमेदवारीवर भिस्त आहे. नुवेत भाजपचे मागील उमेदवार अँथोनी बार्बोझा हे दावेदार आहेत.
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हेही ज्येष्ठ आमदार असून त्यांनी आपली राजकीय वारसदार म्हणून आपल्या मुलीला डॉ. गौरी शिरोडकर यांना जि.पं. वर निवडून आणले आहे. त्यामुळे २०२७ ची निवडणूक त्यांची शेवटची ठरू शकते. गौरी यांना अजून काही वर्षे अनुभव हवा असे एका मुलाखतीत त्यांनी बोलून दाखवले होते. त्यामुळे २०३२ मध्ये कदाचित कन्येला संधी द्यावी असा त्यांचा विचार आहे. काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नाडिस हे सध्या गोवा फॉरवर्डमध्ये आहेत. ते आजारी असले तरी आपणास शेवटची निवडणूक लढवायची आहे, असे ते म्हणत आहेत.
काँग्रेस व गोवा फॉरवर्ड युती आहे. त्यामुळे काँग्रेसने हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला सोडला तर फर्नाडिस शेवटची निवडणूक लढवू शकतात. राज्यातील चार मतदारसंघ आदिवासीं (एसटी) साठी राखीव झाले तर त्यात केपे मतदारसंघाचाही समावेश असेल. तसे झाल्यास माजी मंत्री व भाजपमध्ये असलेले प्रकाश वेळीप हे येथे उमेदवारीचा दावा करणार आहेत. त्यांचेही वय झालेले असल्यामुळे आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. मात्र एसटींना राजकीय आरक्षण मिळाले नाही तर त्यांच्या ऐवजी बाबू कवळेकर यांना भाजप संधी देणार आहे.