Goa Assembly Election | फातोर्थ्यात तिरंगी महासंग्रामाची नांदी?

वेध विधानसभा निवडणुकीचे - सरदेसाई-दामू नाईकांविरुद्ध काँग्रेसची नवी खेळी; गिरीश चोडणकर ठरल्यास तीन दिग्गज आमनेसामने
Goa Assembly Election
Goa Assembly Election
Published on
Updated on

मडगाव : गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाच्या 'गोवा फर्स्ट' युतीनंतर फातोर्डा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. काँग्रेसने या मतदारसंघात स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर पक्षाने उमेदवारीची जबाबदारी सोपविल्यास फातोर्थ्यात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, भाजपचे दामू नाईक आणि काँग्रेसचे गिरीश चोडणकर असे तीन प्रमुख पक्षांचे तीन दिग्गज नेते प्रथमच समोरासमोर उभे ठाकण्याचा योग येऊ शकतो. त्यामुळे फातोर्थ्याची निवडणूक दक्षिण गोव्याच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक चर्चेची लढत ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

फातोर्डा मतदारसंघ हा केवळ विधानसभा मतदारसंघ नाही, तर दक्षिण गोव्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी सलग विजय मिळवत या मतदारसंघावर आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. भाजपचा मजबूत मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या फातोर्थ्यांत सरदेसाई यांनी प्रत्येक वेळी भाजपच्या उमेदवारांना रोखत स्वतःचा स्वतंत्र राजकीय गड उभा केला.

विशेष म्हणजे विजय सरदेसाई यांची राजकीय जडणघडण काँग्रेसमधूनच झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. फातोर्डा आणि मडगाव परिसरात काँग्रेसची संघटना उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. युवकांना पक्षाशी जोडणे, स्थानिक नेतृत्व घडविणे आणि काँग्रेसची मुळे मजबूत करणे या कामांमुळे सरदेसाई काँग्रेसमधील प्रभावी युवा चेहरा बनले होते. मात्र पुढे मतभेद वाढल्यानंतर त्यांनी काँग्रेसची साथ सोडत गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर फातोर्थ्यात काँग्रेसची पारंपरिक मतपेढी मोठ्या प्रमाणात गोवा फॉरवर्डकडे वळली.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर विजय सरदेसाई यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्या निर्णयामुळे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील संबंध पूर्णपणे बिघडले. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष सुरू राहिला. लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी ती आघाडी फार काळ टिकली नाही. आता गोवा फॉरवर्डने आम आदमी पक्षासोबत हातमिळवणी करत नवीन आघाडी उभारल्याने काँग्रेसनेही फातोर्थ्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेससाठी फातोर्डा हा आता प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. गोवा फॉरवर्डमुळे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला हातातून गेला. त्यामुळे पक्षाला पुन्हा या मतदारसंघात आपले अस्तित्व सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यांनी निवडणूक लढविल्यास ही केवळ उमेदवारी राहणार नाही, तर काँग्रेसच्या पुनरागमनाची मोठी परीक्षा ठरेल

संघर्षाचा पालिका राजकारणावरही परिणाम

फातोर्थ्यातील या राजकीय संघर्षाचा परिणाम मडगाव नगरपालिकेवरही होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मडगाव पालिकेतील अनेक प्रभागांमध्ये गोवा फॉरवर्डचा प्रभाव राहिला आहे. पालिकेतील सत्ता समीकरणे, नगरसेवकांचे गट आणि स्थानिक नेतृत्व यामध्ये विजय सरदेसाई यांचा प्रभाव मानला जातो. काँग्रेसने फातोर्थ्यात ताकद लावण्याचा निर्णय घेतल्याने पालिका राजकारणातही नव्या आघाड्या, नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे

भाजपसाठी फातोर्डा प्रतिष्ठेची लढाई

दुसरीकडे भाजपनेही फातोर्डा प्रतिष्ठेची लढाई म्हणून स्वीकारली आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव दौऱ्यात दामू नाईक यांनी निवडणूक लढवावी, असे सूचक विधान केल्यानंतर या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. सलग तीन पराभवानंतर भाजप यावेळी कोणतीही कसर सोडण्याच्या तयारीत नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news