

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) पणजी सर्कल परिसरात कारवाई करून १५ लाख रुपये किमतीचा १४.९५३ किलो गांजा जप्त केला असून, भागीरथ सिंग (३१) आणि प्रशांत सिंग (२७) या दोन संशयितांना अटक केली आहे.
अटकेनंतर दोन्ही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी बिहार येथील अखिलेश गुप्ता हा गांजाचा मुख्य पुरवठादार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, अखिलेश गुप्ता सध्या फरार असून त्याचा शोध एएनसीकडून सुरू आहे. या प्रकरणी अमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास एएनसी करीत आहे.