

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हणजूण येथील 'बर्च' 'रोमियो - लेन' नाईट क्लब आगीतील २५ मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासाठी 'बिंग हॉस्पिटॅलिटी - एलएलपी'चे भागीदार सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांनी न्यायालयात १.२५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, - प्रत्येक मृताच्या कुटुंबाला एकूण २० - लाख रुपये देण्यात येणार आहेत. - डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या या - भीषण आगीत नाईट क्लबमधील २० - कर्मचारी आणि पाच पर्यटक अशा - एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च - न्यायालयाने नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करत अंतरिम स्वरूपात प्रत्येक पीडित कुटुंबाला २० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले होते. सुरुवातीला पीडित कुटुंबीयांकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती.
मात्र, लुथरा बंधूंनी ही मागणी मान्य न करता प्रत्येकी २० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने ही रक्कम अंतरिम स्वरूपाची असून भविष्यातील अंतिम आदेश किंवा नुकसान भरपाईच्या निर्णयानुसार तिचे समायोजन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. एलएलपीतर्फे वरिष्ठ वकील सुबोध कंटक यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पीडित कुटुंबाला २० लाख रुपयांची रक्कम तीन टप्प्यांत दिली जाणार आहे.
त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ लाख रुपये म्हणजेच २५ कुटुंबांसाठी एकूण १.२५ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी ५ लाख रुपये म्हणजेच एकूण १.२५ कोटी रुपये, ७ डिसेंबर २०२६ पर्यंत जमा केले जातील. उर्वरित प्रत्येकी १० लाख रुपये, म्हणजेच एकूण २.५० कोटी रुपये, ७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत देण्यात येणार आहेत.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या २० कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात कामगार आयुक्तांकडे 'वर्कमेनस् कॉम्पेन्सेशन अॅक्ट' अंतर्गत स्वतंत्र कार्यवाही सुरू आहे. पाच पर्यटकांच्या कुटुंबीयांनी हरियाणातील जिल्हा ग्राहक विवाद निवारण मंचातही कार्यवाही सुरू केली आहे. गोवा खंडपीठाने लुथ्रा बंधूंच्या वतीने देण्यात आलेले हे निवेदन नोंदवून घेतले.