

कुडचडे : खामामळ जंक्शन येथे बेफिकीर व निष्काळजीपणे कार चालविल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार पत्रकाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे कुडचडे-सावर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१० च्या सुमारास खामामळ जंक्शन येथे घडली. एकनाथ गावडे (रा. केरी, फोंडा) हे आपल्या कारने कुडचडेहून सावर्डेच्या दिशेने जात असताना त्यांनी वाहन बेफिकीर व निष्काळजीपणे चालवून पुढे चाललेल्या प्लेझर दुचाकीला धडक दिली.
या अपघातात स्कूटरस्वार पॉल काह्वलो (रा. खामामळ, कुडचडे) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पॉल काह्वलो हे एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रासह कुडचडे-सावर्डे परिसरात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
याप्रकरणी कुडचडे पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.