

Goa DMT Drug Seized Pedne police operation
Summary
कोरगाव - पेठवाडा येथे सुमारे एक कोटींचे डीएमटी ड्रग्ज जप्त
पेडणे पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ची संयुक्त कारवाई
इना वोल्कोवा या बेलारुसच्या महिलेला अटक
पणजी: पेडणे पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्या संयुक्त पथकाने कोरगाव - पेठवाडा येथे सुमारे एक कोटी रुपयांचे डीएमटी ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी इना वोल्कोवा या बेलारुसच्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
९ ते १० डिसेंबररोजी दरम्यान एनसीबी आणि पेडणे पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. इना वोल्कोवा हिच्या ताब्यातून ड्रग्ज आणि ते तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ९३३ ग्रॅम वजनाचे, गडद तपकिरी रंगाचे डीएमटी लिक्वीड आणि ३८८ ग्रॅम वजनाचे ब्राऊन रंगाचे द्रव स्वरूपातील डीएमटी यांचा समावेश आहे.
याशिवाय, ड्रग्ज काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४१ ग्रॅम कच्च्या लाकडाच्या साली आणि ८ ग्रॅम वजनाच्या सुकवलेल्या मशरूम्स (यांचा उपयोग डीएमटी द्रवात केला जात असल्याचा संशय आहे) देखील जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मालाची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजित किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.
याप्रकरणी एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून, बेलारुसची नागरिक इना वोल्कोवा (सध्या रा. पेठवाडा, कोरगाव, पेडणे) हिला बुधवारी (दि. १०) अटक करण्यात आली आहे. पर्वरीचे एनसीबीचे पोलिस निरीक्षक मोहन राणे पुढील तपास करीत आहेत.