

म्हापसा : खेळण्याच्या नादात एका सहा वर्षीय बालिकेने फिश टँकमधील जिवंत मासा गिळल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना बस्तोडा येथे समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तोडा येथील ही चिमुकली आपल्या घरातील इतर मुलांसोबत खेळत होती. खेळता खेळता घरातील फिश टबजवळ पोहचली व तिने त्यातील एक जिवंत मासा उचलून तोंडात टाकला. लहान मासा थेट घशात अडकल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ती गुदमरू लागली.
हा प्रकार लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिला तातडीने उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासले असता मृत घोषित केले. या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) पाठवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.