

पणजी : कोलवाळ येथील कारागृहात गांजा पुरवण्यासाठी गोळे तयार करून कारागृहात फेकल्याच्या प्रकरणाचा उलगडा म्हापसा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनासह चार युवकांना अटक करण्यात आली आहे. 14 जून रोजी हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैद्यांपर्यंत गांजा पोहोचवण्यासाठी आरोपींनी सुमारे 1.4 किलो गांजाचे 7 गोळे तयार केले आणि ते कारागृहाच्या परिसरात भिंतीवरून फेकले. गांजाची किंमत 1 लाख 40 हजार आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून गौतम तलवार (24 वर्षे, रा. अन्साभाट म्हापसा), सॅम्युअल पुजारी (24 वर्षे, रा. अन्साभाट-म्हापसा), जाफर मुल्ला (24 वर्षे, रा. खोर्ली-म्हापसा) आणि एक अल्पवयीन अशा चारही आरोपींना अटक केली.
पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी कारागृहात आधीच कैद असलेल्या व्यक्तींना हे ड्रग्ज पोहोचवण्यासाठी या पद्धतीचा वापर करत होते. या प्रकारामुळे तुरुंगाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अटक केलेल्या चौघांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याला बाल न्याय कायद्यांतर्गत बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. उर्वरित तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात अजून कोणी गुन्ह्यात सहभागी आहे का, याचा शोध घेण्यासाठी म्हापसा पोलिस तपास करीत आहेत. कारागृह प्रशासनालाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून, कारागृहातून या प्रकरणात कुणाचा सहभाग आहे कीय, याची चौकशी सुरू आहे.
मडगाव : स्वतः केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगण्याबरोबर गुन्हेगारांना समाजापासून वेगळे ठेवण्यासाठी उभारलेले कारागृह कैद्यांसाठी पार्टी डेस्टिनेशन बनत आहे. कोलवाळ कारागृहातील गुरांच्या गोठ्यात दूध काढण्याच्या बहाण्याने गेलेल्या पाच कैद्यांनी चिकन, मटण आणि दारूसह, ब्लूटूथ स्पीकरवरील संगीताच्या तालावर बेभान होऊन पार्टीचा आनंद लुटत तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान दिले आहे.
आयआरबीच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीला आला असून त्यांच्याकडून स्मार्टफोन, ब्लूटूथ स्पीकर आणि शीतपेयाच्या बाटलीतून आणलेल्या मद्यासह, नशेसाठी वापरण्यात येणार्या दीडशे ग्रॅम गोल्डन टोबॅको जप्त करण्यात आला आहे.
तुरुंग अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा नोंद केलेल्या कैद्यांत रेमंड फर्नांडिस, उपनिष कुमार, उदय गावकर, मांतेश दोडामणि आणि प्रशांत बाल्हा आदींचा समावेश आहे. पार्टीसाठी सर्व साहित्य पुरवलेल्या एका तुरुंग सुरक्षा रक्षकावर सध्या कारवाईची टांगती तलवार आहे. सविस्तर माहितीनुसार, सदर घटना 22 मे रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली आहे. कारागृहाच्या आऊटर कॉर्डनच्या आवारात गुरांचा गोठा असून गोठ्याची साफसफाई आणि गुरांचे दूध काढण्याचे काम तुरुंगातील कैदी करतात. हे काम करण्यासाठी जाणार्या कैद्यांसह एक तुरुंग सुरक्षारक्षक पाठवला जातो. काही दिवसांपासून कैद्यांना त्या गोठ्याकडे सोडून तो सुरक्षारक्षक तेथे थांबत नव्हता. 22 मे रोजी कैद्यांना गोठ्याकडे घेऊन गेलेला तो सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे गायब झाला होता. टेहळणी करणार्या आयआरबीच्या जवानाला त्या गोठ्याजवळ संशयास्पद हालचाली आढळल्यामुळे त्याने पोलिस उपनिरीक्षक गौरीश राव यांना त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजेश चोडणकर, हेडकॉन्स्टेबल मॅथ्यू डिकॉस्टा, मधु साळगावकर, बाबली गडेकर, प्रितेश तळवणकर यांनी गोठ्याकडे धाव घेतली असता गोठ्यात रेमंड फर्नांडिस, उपनिष कुमार, उदय गावकर, मांतेश दोडामणि आणि प्रशांत बाल्हा हे पाच जण पार्टी करताना आढळले. पोलिसांना त्यांच्याकडून तंबाखूचे पाकीट, दीड ग्रॅम गोल्डन वेर्जीनिया टोबॅको, लाईम ट्यूब, एक लाइटर, मोबाईल चार्जर अॅडप्टर, डेटा केबल, एक स्मार्ट मोबाइल फोन, ब्लूटूथ पोर्टेबल स्पीकर, शीतपेयाच्या बाटलीतून आणलेले मद्य, पुलाव, चिकन फ्राय, ग्रेव्ही, चार तळलेले बांगडे व दोन पाकिटे सुकी कोळंबी जप्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत हरिजन आणि उपअधीक्षक उमेश सावंत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
पाचही कैद्यांना गुरांच्या गोठ्याकडे आणण्याची जबाबदारी दिलेला सुरक्षारक्षक नारायण नाईक हा त्यांना गोठ्याकडे सोडून तेथून नाहीसा झाला होता. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर 45 मिनिटानंतर तो घटनास्थळी आला. त्याची चौकशी करून कारवाईची मागणी पोलिस निरीक्षक सरोज दिवकर यांनी कारागृह अधीक्षकांकडे केली आहे.
अमली पदार्थाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्या कोलवाळच्या तुरुंगात गांजा आणि क्रिस्टल मॅथ नंतर आता गोल्डन टोबॅकोचा वापर वाढला आहे. साडेतीनशे रुपयांत मिळणारे गोल्डन टोबॅकोचे एक पॅकेट तब्बल अडीच हजार रुपये एवढ्या किमतीत विकले जात आहे. गोल्डन वर्जिनिया, टोबेको चरस, गांजा किंवा एमडीसह ओढता येतो. कारागृहात या तंबाखूचा सर्रास वापर होत असल्याचे समोर आले आहे.