

पणजी ः गोव्यामध्ये बहुतांश गावांमध्ये पाच दिवसांची गणेशमूर्ती पूजली जाते, तर काही ठिकाणी सात दिवसांची श्रींची मूर्ती पूजली जाते. सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे मंगळवारी 2 रोजी विधिवत विसर्जन करण्यात आले.
पणजी परिसरामध्ये आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पुढाकाराने 11 ठिकाणी गणेश विसर्जनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कमानी बांधून, गणेश विसर्जन स्थळांवर पायर्या बांधून विसर्जन स्थळे सुशोभीत करण्यात आली होती. रायबंदर पाटो, रायबंदर फेरी धक्का, मांडवी पूल परिसर, पणजी फेरी धक्का, मिरामार, करंझाळे अशा अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांसह विजेचीही सोय करण्यात आली आहे.
पावसाने विसावा घेतल्यामुळे विसर्जन मिरवणुकीला वेगळाच रंग चढला होता. अबालवृद्ध लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला निरोप दिला. पावसाने विसावा घेतल्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन करताना कोणतीही अडचण आली नाही. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे अकराव्या दिवशी विसर्जन केले जाते. तर घरगुती गणेशमूर्ती दीड दिवस, पाच दिवस, नऊ दिवसही ठेवल्या जातात.