

पणजी : राज्यात सध्या जंपिंग चिकन अर्थात बेडकांचे मांस खाणारे जागोजागी बेडकांचा शोध घेताना दिसत आहेत. राज्यात बेडूक पकडण्यास बंदी आहे. वन खात्याने बेडूक पकडले जाऊ नयेत, यासाठी विविध पथके स्थापन करून अनेक ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे; मात्र वन खात्याच्या अधिकार्यांची नजर चुकवून काहीजण बेडूक पकडत आहेत. काहीजण ते हॉटेल व्यावसायिकांना विकतात, तर काहीजण घरात शिजवून खातात; मात्र म्हशीच्या व शेळीच्या मांसाप्रमाणे बेडकाच्या मांसाच्या अतिसेवनामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
याबाबत कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर म्हणाले, रेड मांस हे कॅन्सरचा धोका वाढवणारे असते. त्याच्या अतिसेवनाने कॅन्सरचा धोका संभवतो. बॉयलर चिकन हे हिरव्या श्रेणीत येते; मात्र बेडूक, शेळी व म्हशीचे मांस हे लाल श्रेणीत (रेड) येत असल्यामुळे त्यांच्या अतिसेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो.
राज्यातील चिकन आणि मटणाची दुकाने लाल श्रेणीतून हिरव्या श्रेणीत आणण्याचा निर्णय गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीपीसीबी) स्थगित ठेवला आहे. त्यामुळे ही दुकाने यापुढे ’लाल श्रेणी’तच राहणार आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिकन आणि मटणाची दुकाने ’लाल श्रेणी’त ठेवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आवश्यकतेनुसार श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्यांना दिला होता. त्यानुसार जीपीसीबीने 160 व्या बैठकीत चिकन आणि मटण दुकाने हिरव्या श्रेणीत आणण्याबाबत निर्णय घेतला होता; मात्र तसे केल्यास मिळेल तिथे बकरी व म्हैस यांची कत्तल सुरू होऊन पर्यावरणाला धोका संभवत असल्याचा दावा काही सदस्यांनी केला. त्यामुळे ही दुकाने ’लाल श्रेणी’तच ठेवण्याचा निर्णय प्रदूषण मंडळाने घेतला.