

पणजी : गोवा सरकार शेतीसाठी नांगरणीपासून ते कापणीपर्यंत सर्व प्रकारच्या विविध उपक्रमांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. ज्या शेतीमध्ये ट्रॅक्टरने काम करणे शक्य होत नाही, तेथे मजुरातर्फे काम करावे लागते. यासाठी सरकार अनुदान देते. यापुढे या शेतीच्या कामांत मनरेगाचे कामगार लावले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.
शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. साळगावचे आमदार केदार नाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. कृषी खाते शेत नांगरणीसाठी ट्रॅक्टर वगैरे यंत्रे उपलब्ध करते, त्यासाठी कमी दर आकारते, मात्र ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाहीत अशा ठिकाणी मजुरांना न्यावे लागते, त्यांची रोजंदारी शेतकर्यांना परवडत नाही, त्यामुळे सरकारने त्यासाठी अनुदान देण्याची मागणी नाईक यांनी केली. नीलेश काब्राल यांनी कृषी आणि फलोत्पादनासंबंधी एकूण क्षेत्रफळ वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी केली, तर आमदार वेंझी व्हिएगस यांनी भातासाठी आधारभूत किंमत फक्त दोन रुपये वाढवलेली आहे ती जास्त वाढवावी, अशी मागणी केली. जीत आरोलकर यांनी नारळ महाग झाले असल्यामुळे आधारभूत नारळाच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. कृषिमंत्री नाईक यांनी सांगितले की, ट्रॅक्टरची वेळ वाढवून देतानाच कामगारांसाठीही सरकार अनुदान देण्याबाबत विचार करणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, केंद्र सरकारच्या अमृतकाल धोरणानुसार शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, जिथे यंत्रे तथा मशीन जात नाही तेथे मजुरांसाठी अनुदान दिले जाईल, त्यासाठी नियम तयार केले जातील. ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत मनरेगा योजनेचे मजूर शेतात उतरवले जातील.
मानकुराद आंंबे असो किंवा इतर फळझाडे या फळझाडांचे रोप लावण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी सरकार 600 रुपये अनुदान देत असल्याची माहिती कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिली. अनेकांना ही योजना माहीत नव्हती. नागरिकांनी आणि आमदारांनी मानकुराद आंब्याचे रोपे लावावीत व हवे तेवढे खावेत, असेही रवी नाईक म्हणाले.
मानकुराद आंब्याची लागवड राज्यात वाढावी यासाठी कृषी खाते मानकुराद आंबा लागवड करणार्यांना 2 लाख प्रति हेक्टर अनुदान देते. नागरिकांनी जास्तीतजास्त मानकुरादची रोप लावावी. तसेच मानकुरादला जीआय टॅग देण्यासंदर्भात विचार करू. जुन्या झाडावर विसंबून न राहता नवी रोपे लावावीत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.