पणजी : राज्यातील सुमारे 160 गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून 2.37 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव, मनीषा जोशी, रमेश जोशी, अनुप अधिकारी यांच्यासह 22 एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राज्यातील गुंतवणूकदारांतर्फे पोलिस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्यात 1 एप्रिल 2021 ते 30 ऑक्टोबर 2024 दरम्यान आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड कंपनीने गोव्यात विविध ठिकाणी शाखा सुरू करून गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवले. त्यानुसार, संशयित व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव यांनी राज्यात एजंट नियुक्त केले. त्यांच्यामार्फत कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास लावले. कंपनीने नेमलेल्या एजंटांमार्फत मासिक योजना, कायम ठेव योजना आणि इतर योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास लावले. या योजनेअंतर्गत 160 गुंतवणूकदारांनी सुमारे 2 कोटी 37 लाख 96 हजार 622 रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, कंपनीने गोव्यातील सर्व शाखा बंद करून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा विभागात धाव घेतली. त्याची दखल घेऊन पोलिस निरीक्षक राझाशद शेख यांनी आरजेपॅपिलॉन निधी लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव, मनीषा जोशी, रमेश जोशी, अनुप अधिकारी याच्यासह 22 एजंटांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.