

खानापूर : पुढील वर्षी 6 मे रोजी होणाऱ्या बैलूर (ता. खानापूर) लक्ष्मी यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थ व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यात्रेशी संबंधित चारही गावांमध्ये पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
लक्ष्मी यात्रेच्या पृष्ठभूमीवर विकासकामांच्या नियोजनासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 4) बैलूरमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने चारही गावातील प्रमुख रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, वीज खाबांची दुरुस्ती आणि यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. विविध सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्वय साधून टप्प्याटप्प्याने सुविधांची पूर्तता करण्यासाठी कार्यवाही हाती घेण्याची सूचना केली आहे अशी माहिती आमदार हलगेकर यांनी दिली.
यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी मंगेश गुरव यांची निवड करण्यात आली. यात्रा होणाऱ्या गावांमध्ये खानापूर तालुक्यातील बैलूर, देवाचीहट्टी, मोरब आणि बेळगाव तालुक्यातील बाकमूर या गावांचा समावेश आहे. वार पाळण्याचा विधी यापूर्वीच पार पडला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील मंदिरांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि मूलभूत सुविधांच्या पुर्ततेसाठी प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी ता. पं. ईओ रमेश मेत्री, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता सचिन गस्ते, लक्ष्मण झांजरे, कृष्णकांत बिर्जे, पुंडलिक नाकाडी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आदी उपस्थित होते.