

पणजी : राज्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी चार मृतदेह आढळले. यातील दोन जुने गोवे येथे, एक पणजी येथील मांडवी नदीत, तर एक आमोणे येथे नदीत आढळला.
जुने गोवे परिसरात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. एक मृतदेह हा बिर्याणीच्या दुकानात काम करणार्या 25 वर्षीय युवकाचा आहे, तर दुसरा मृतदेह हा अन्नपूर्ण रेस्टॉरंटच्या जवळील ओढ्यात सापडला. जुने गोवेतील पहिला मृतदेह हा बिर्याणी दुकानावर मदतनीस म्हणून काम करणार्याचा असून त्याच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. मृताचे नाव मिर्झा सोरेन (वय 26, मूळ ओडिशा) असे आहे. त्याचा चुलत भाऊ व बहिणीने पोलिसांना माहिती दिली की, त्याला काही दिवसांपूर्वी कावीळ झाली होती आणि दोन दिवसांपासून तो जेवलाही नव्हता. तो मद्याच्या आहारी गेला होता. डॉ. आदित्य नाईक यांनी मृतदेहाचे विच्छेदन केले व मृत्यूचे कारण हिपॅटोसेल्युलर फेल्युअरमुळे (स्वादुपिंड रक्तस्राव) मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एडविन डायस पुढील तपास करत आहेत.
दुसरा मृतदेह जुने गोवे पोलिस स्थानकाजवळच्या ओढ्यात आढळला. हा मृतदेह तानाजी गायकवाड (62, कोल्हापूर, महाराष्ट्र) यांचा आहे. गायकवाड मद्यपी होते. दारू पिऊन ते रस्त्याच्या कडेला किंवा गटाराच्या काठावर झोपायचे अशी माहिती पोलिसांनी दिली. तिसरा मृतदेह मांडवी नदीत आढळला. मृत युवक 30 ते 35 वयाचा असावा. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.