

पणजी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान म्हणून गोवा सरकार महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. पर्वरी येथे आंबेडकर भवन बांधण्यात येणार असून पुढील सहा महिन्यांच्या आत इमारतीची पायाभरणी करून याच सरकारच्या कारकिर्दीत ते पूर्ण होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त पणजीतील आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आंबेडकर भवनासाठी पर्वरी येथे 2,140 चौ.मी. जमीन यापूर्वीच संपादन करण्यात आली असून बांधकामासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प साकार करणे, हे भाजपचे स्वप्न असून हे भवन भाजप सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होईल. हे भवन डॉ. आंबेडकर यांच्या आदर्शांना आणि योगदानाला समर्पित असेल. सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ते नावारुपास येईल. या कार्यक्रमावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, डॉ. आंबेडकर समितीचे अध्यक्ष सतिश कोरगावकर, पुरोगामी विचारवंत सुशील म्हसदे, भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखा अध्यक्ष एस. के. जाधव, सिंधुदुर्ग विभाग प्रमुख तुकाराम तांबोसकर, अर्जुन जाधव, वासंती परवार, कृष्णा कोरगावकर, श्याम म्हापसेकर, निखिल प्राजक्ते व मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक न्याय आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी चर्चासत्रे, प्रदर्शन आणि सामुदायिक उपक्रमांसाठी व्यासपीठ असेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची सोय तसेच अनेक सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.