

पणजी : वेगवेगळ्या संकेतस्थळांवर अस्तित्वात नसलेल्या हॉटेल्सची माहिती आणि फोटो वापरून बुकिंग घेत अनेक पर्यटकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्या रॅकेटचा गोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी गोवा पोलिसांनी चार जणांना अटक केली. त्यातील एक ग्वाल्हेर येथील, तर तिघे हैदराबाद येथील आहेत.
सौरभ दुसेजा (रा. ग्वाल्हेर), सय्यद अली मुख्तार, मोहम्मद फिरोज आणि मोहम्मद अझरुद्दीन सैफ (सर्व रा. हैदराबाद) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. ही फसवणूक 2022 पासून सुरू असून 500 पेक्षा अधिक जणांना या टोळीने गंडा घातला आहे. त्यांनी लुटलेली रक्कम एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयपीएस अधिकारी मयंक दुबे आणि अरुण बलगोत्रा उपस्थित होते. अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्वतः हॉटेल मालक असल्याचे भासवत अस्तित्वात नसलेल्या हॉटेल्सचे फोटो आणि माहिती बनावट वेबसाईटस्वर टाकत. इतर हॉटेल्स आणि बंगल्यांच्या तुलनेत त्यांनी दाखवलेल्या हॉटेल्सची किंमत खूपच कमी असायची. यामुळे पर्यटक या लोकांच्या जाळ्यात ओढले जायचे. पर्यटकांकडून आगाऊ रक्कम घेतल्यानंतर हे संशयित गायब व्हायचे.
फसवणूक झालेल्या चंदीगड येथील पंकज धीमान यांनी फसवणुकीची तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. त्यांनी एका हॉटेलसाठी 20 हजार रुपये देत आगाऊ बुकिंग केले होते. ठरलेल्या तारखेला जेव्हा संकेत स्थळावर दिलेल्या ठिकाणी पोचले तेव्हा त्यांना कोणताही बंगला अस्तित्वातच नसल्याची आणि आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. यानंतर त्यांनी लगेच नजिकच्या पोलिस स्थानकात तक्रार दिली. या प्रकरणी आयपीएस अधिकारी मयंक दुबे व अरुण बलगोत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सूरज गावस, उपनिरीक्षक साहिल वारंग, रमेश हरिजन तसेच कळंगुट पोलिस शिपाई राज परब यांच्या पथकाने जयपूर, ग्वाल्हेर येथून एकास तर हैदराबाद येथील तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचे त्यांनी मान्य केले.
हैदराबाद येथे एका भाड्याच्या खोलीत राहून हे टोळके रॅकेट चालवत होते. याकामी काही महिलांना कर्मचारी म्हणून ठेवण्यात आले होते. 15 वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे जमा केले जायचे. सध्या ही सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत, अशी माहिती अधीक्षक कौशल यांनी दिली.