

पणजी : Maha Kumbh 2025 | गोवा हे दक्षिणेकडील काशी आहे. गोवा पर्यटन राज्य आहे. सन, स्यांन्ड एन्ड सी सोबत आता स्पीच्चुरल उपक्रम गोव्यात वाढले आहेत. सनातन संस्कृती रक्षणासाठी गोवा सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आज गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी करमळी गोवा रेल्वेस्थानकावर महाकुंभला जाणाऱ्या गोवेकर भाविकांच्या रेल्वेला झेंडा दाखवला.
यावेळी समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, राजेश फळदेसाई, भाजप प्रदेश अध्यक्ष दामोदर नाईक, माजी आमदार सिध्दार्थ कुकळ्येकर, स्थानिक सरपंच आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाकुंभात स्नान करण्याची शेकडो गोवेकरांची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकार तीन रेल्वे प्रयागराजला पाठवत आहे. आज पहिली रेल्वे निघत असून दि. १३ व २१ रोजी दोन रेल्वे जाणार आहेत. ज्यांना महाकुंभला जायचे आहे त्यांनी समाजकल्याण खात्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. महाकुंभला गेल्यानंतर स्वत: सह सोबत्यांची काळजी घ्या. पवित्र स्नान करा. जाण्या-येण्यासह राहण्याची सोय सरकारने केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.