Zuarinagar fire | झुआरीनगरात अग्नितांडव

भंगारअड्ड्याला लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे साहित्य खाक
Zuarinagar fire
Zuarinagar fire | झुआरीनगरात अग्नितांडव
Published on
Updated on

वास्को : झुआरीनगर येथे एका भागातील काही भंगारअड्ड्यांना बुधवारी (दि.19) मध्यरात्री आग लागल्याने हजारो रुपयांचे भंगार जळून खाक झाले. या ठिकाणी जाण्यासाठी योग्य वाट नसल्याने अग्निशमन दलाला मोठी धावपळ करावी लागली. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलांच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने इतर भंगारअड्डे बचावले. हे भंगार अड्डे उभारताना तेथे कोणतीही सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या आगीमुळे इतर ठिकणांचे भंगार अड्डे पुन्हा चर्चेत आले आहेत. भंगार अड्ड्यांना आगी लागण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. तथापि, त्यापासून कोणीच काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे. या भंगार अड्ड्यातील प्लास्टिक मोठ्या प्रमाणात जळाल्याने काळाकुट्ट धुरांचे लोट पसरले होते. या धुराचा त्रास काहीजणांना झाला.

झुआरीनगर येथे एका खासगी जागेतील नवीन व खासगी औद्योगिक वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार अड्डे तयार झाले आहेत. काहीजणांनी तर तेथे गोदामे घेतली आहेत. त्या गोदामात भंगार वस्तूंचा साठा करण्यात येतो. तसचे मोकळ्या जागेतही वेळप्रसंगी साठा करण्यात येतो. या औद्योगिक वस्तीच्या खालच्या बाजूस काहीजणांनी पत्र्यांच्या खोल्यांमध्ये भंगारअड्डे सुरू केले आहेत. ते अड्डे एकमेकांपासून दूर नाहीत. तेथे सुरक्षिततेची खबरदारी घेण्यासाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे. घटनास्थळी पाण्याचे बंब नेण्यासाठी व उभा करण्यासाठी जागाच नसल्याने मोठी पंचाईत झाली. त्यामुळे दूरवर बंब उभे करून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धावपळ करावी लागली. मडगाव, वास्को, वेर्णा, पणजी, तसेच मुरगाव बंदर प्राधिकरण, गोवा शिपयार्ड येथून दलाची अग्नीशमन वाहने आणण्यात आली. मोठ्या शर्थीने आग सकाळपर्यंत आटोक्यात आल्याने ती इतरत्र पसरली नाही.

या आगीमुळे पत्रे वाकडेतिकडे झाले होते. त्याखाली प्लास्टिक वस्तूंसह आग धुमसत होती. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पणजीहून हैड्रोलिक शिडी असलेला बंब पाचारण करण्यात आला.त्या बंबावरील जवानांनी सतत पाण्याचा मारा करून धुमसणारी आग विझविण्याचा प्रयत्न चालविला होता. तेथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला होता. तथापी प्लास्टीक वस्तूंमुळे आग पुन्हा पेट घेत होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडत होती. तेथे आग लागल्यावर इतरांनी मोकळ्या जागेत असलेले आपले भंगार गोदामात हलविण्यास आरंभ केला.

सिलिंडर्सचा स्फोट?

घटनास्थळी गॅस सिलिंडर असल्याने आग भडकण्यास मदत झाली. दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा दावा परिसरातील लोकांनी केला आहे. अग्निशमन दलाने इतर गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने आणखी हानी टळली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी संबंधित खात्यांनी लक्ष देण्याची व कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय

काही भंगार वस्तू तोडण्यासाठी तेथे गॅस कटरचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तेथे गॅस सिलिंडरही असतात. या अड्ड्याकडे जाण्यासाठी वाट नाही. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भंगार अड्डे आहेत, हे बर्‍याचजणांच्या खिजगणीत नसल्याचे दिसून येते. बुधवारी मध्यरात्री या भंगारअड्ड्यांपैकी एका अड्ड्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी उडून आग लागली. तेथील कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या तसेच इतर वस्तू असल्याने आग पसरू लागली. तेव्हा अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच विविध ठिकाणचे अग्निशमन दल आपल्या बंबांसह तेथे पोहोचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news