

पणजी : सरकारने गोवा शालेय शिक्षण नियम 2025 मध्ये सुधारणांचा मसुदा प्रकाशित केला आहे. त्या अनुषंगाने हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी 5 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यानुसार पालक, शिक्षक आणि शिक्षण संघटनांनी दिलेल्या सूचना विचारात घेण्यात येतील.
सध्याचे चित्र पाहता मुदत वाढवण्याची मागणी पालक करत आहेत. त्यानुसार हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ करण्याचा सरकार विचार करत आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. पालक आणि शिक्षकांच्या सूचना लक्षात घेऊन गोवा शालेय शिक्षण (सुधारणा) नियम, 2025 च्या अंतिम मसुद्यात आवश्यक बदल करण्यात येतील. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरातील पालक आणि शिक्षकांनी प्रत्यक्ष आणि ईमेलद्वारे आपल्या सूचना आणि हरकती विभागाला कळवल्या आहेत. पालकांच्या सर्व सूचना न्यायालयाला कळवण्यात येतील. त्यावर न्यायालय निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिग्ज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पालकांच्या बाजूने मुदतवाढ महत्त्वाची असल्याचे नमूद केले. आतापर्यंत तब्बल 11 हजारांहून अधिक पालकांकडून सूचना आणि हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. अजून अनेक ईमेल मोजणे बाकी आहे. आता न्यायालय काय निर्णय देणार, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.