

गुजरात: हिंदी चित्रपटासाठी प्रतिष्ठित मानला जाणार्या फिल्मफेअर 2025 पुरस्कारात गोव्याने चमकदार कामगिरी केली आहे. फोंडाचे सुपुत्र आणि दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांनी ’आर्टिकल 370’ या हिंदी चित्रपटासाठी प्रतिष्ठित फिल्मफेअर 2025 चा ’उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण)’ पुरस्कार पटकावला आहे. आदित्य जांभळे हे फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे पहिलेच गोमंतकीय ठरले आहेत. अहमदाबाद येथे 70 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आदित्य जांभळे यांना 2016 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आबा, ऐकताय ना?’ या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2018 मध्ये ‘खरवस’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला. ’इफ्फी 2018’ मध्ये ’खरवस’ला इंडियन पॅनोरमा विभागात ’ओपनिंग फिल्म’ चा मान मिळाला होता. त्यांच्या ’अमृतसर जंक्शन’ या तिसर्या लघुपटामुळे त्यांना ’उरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ज्याची परिणती ’आर्टिकल 370’ चित्रपटात झाली.
यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात किरण राव दिग्दर्शित ’लापता लेडीज’ या चित्रपटाने तब्बल 14 पुरस्कार जिंकत नवा विक्रम रचला आहे. यापूर्वी सर्वाधिक पुरस्कारांचा विक्रम ’गली बॉय’च्या नावावर होता. ’लापता लेडीज’ला बेस्ट फिल्म आणि किरण राव यांना बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला.
-उत्कृष्ट अभिनेता (मेल): अभिषेक बच्चन (आय वॉन्ट टू टॉक) आणि कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) यांना संयुक्तपणे
-उत्कृष्ट अभिनेत्री (फिमेल): आलिया भट्ट (जिगरा)
-उत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स): राजकुमार राव
-उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स): प्रतिभा रांटा (लापता लेडीज)
-उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य सुहास जांभळे (आर्टिकल 370) आणि कुणाल खेमू (मडगाव एक्सप्रेस) संयुक्तपणे.
-उत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): लक्ष्य (किल)
- लाइफटाईम अचिव्हमेंट: झीनत अमान आणि श्याम बेनेगल (मरणोत्तर).