

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) कथित अनियमितताप्रकरणी अंतर्गत कारवाईचा फास अधिक आवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन केलेल्या कारवाया, खाजगी कंपन्यावरील कारवाईत वैयक्तिक हितसंबंधांचा संशय आणि अखाद्य सुपारी प्रकरणा नंतर सुरू झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर २० हुन अधिक वरिष्ठ अधिकारी कारवाईच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यात नुकतीच बैठक झाल्याची चर्चा आहे. या संभाव्य कारवाईमध्ये नाशिक, पुणे आणि भिवंडी येथील अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे. कार्यक्षेत्राच्या मर्यादेचे उल्लंघन करून कारवाई करण्यात आली का तसेच खाजगी कंपनीवरील कारवाईमागे वैयक्तिक हितसंबंध होते का, याची पडताळणी अन्न प्रशासनाच्या मुख्यालयातून केली जात असल्याची माहिती मिळत आहे. या घडामोडींमुळे 'एफडीए'च्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांच्या अखाद्य सुपारी प्रकरणामुळे एफडीएच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मालेगाव येथे जप्त करण्यात आलेली सुमारे १० कोटी रुपयांची अखाद्य सुपारी कागदोपत्री नष्ट केल्याचे दाखवून प्रत्यक्षात तिची विल्हेवाट काळ्या बाजारात लावल्याचा तसेच चौकशीची फाइल दडपून ठेवल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने नाशिकचे सहआयुक्त अविनाश दाभाडे, अमित रासकर आणि गोपाल कासार, धुळ्याचे सहायक आयुक्त सुवर्णा महाजन तसेच मुंबईचे सहआयुक्त योगेश देशमुख यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्रशासनातील इतर प्रकरणांचीही आढावा घेतला जात असून, या प्रकरणाशी व अनैतिक बेकायदेशीर कारवाईशी संबंधित अधिकारी सध्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नाशिकमधील दोन अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात?
सिन्नर तालुक्यातील पुतलेवाडी येथे उघडकीस आलेली सुमारे १७ लाख रुपयांच्या संशयास्पद दूध पावडर साठा प्रकरणाशाही एफडीएच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे. या प्रकरणात विहित कायदेशीर कर्तव्य बजावण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत सहायक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्नसुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.
अंतर्गत कारवाईकडे लक्ष
सुपारी प्रकरणातील निलंबन, दूध पावडर साठा प्रकरणातील शिस्तभंगाची कारवाईची शिफारस आणि कार्यक्षेत्राबाहेरील कारवायांबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे एफडीएच्या अंतर्गत कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. आणखी २० हुन अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. चौकशी, अधिकृत निष्कर्ष आणि प्रशासनाचा अंतिम निर्णय यानंतरच संभाव्य कारवाईचे स्वरूप स्पष्ट होईल.
"अखाद्य सुपारी प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या व अन्य प्रकरणांमध्ये काही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे."
– नरहरी झिरवाळ, मंत्री, अन्न व औषध प्रशासन