

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
साईनगर, करासवाडा, म्हापसा येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या जाधव कुटुंबावर काळाने एका रात्रीत घाला घातला. घरात अजय जाधव (वय ३८) आणि त्यांचा मुलगा अर्थव (७) यांचे संशयास्पद मृतदेह आढळून आले, तर पत्नी सुवर्णा जाधव (३०) या गंभीर अवस्थेत आढळल्या असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे उपचार सुरू आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावचे असलेले जाधव कुटुंब गेल्या वर्षभरापासून करासवाडा येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. अजय जाधव हे पणजीतील एका खासगी बँकेत नोकरी करत होते.
सुवर्णा या गृहिणी असून अर्थव शालेय शिक्षण घेत होता. शांत व साधे जीवन जगणारे हे कुटुंब अचानक अशा घटनेत सापडल्याने नातेवाईक, शेजारी आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्री अजय जाधव यांनी आपल्या वडिलांना दूरध्वनी करून पत्नी आणि मुलगा झोपत नसल्याची माहिती दिली होती. त्यावर वडिलांनी देवाचा अंगारा लावण्याचा सल्ला दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शनिवारी सकाळपासून अजय यांच्याशी संपर्क होत नव्हता.
वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या वडिलांना संशय आला. अखेर त्यांनी सोनुर्लीहून तातडीने गोवा गाठण्याचा निर्णय घेतला. करासवाड्यातील राहत्या घरी पोहोचताच त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. घरात अजय आणि अर्थव निपचित अवस्थेत पडलेले होते, तर सुवर्णा बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेला पाचारण केले.
तिघांनाही म्हापसा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अजय आणि अर्थव यांना मृत घोषित केले. सुवर्णा यांची नाडी सुरू असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी गोमेकॉमध्ये हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. घरातील परिस्थिती, उपलब्ध वस्तू आणि इतर पुरावे तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्राथमिकदृष्ट्या हा आत्महत्येचा प्रकार असावा, अशी शक्यता व्यक्त होत असली तरी पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. आत्महत्या, अपघात किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा तपास सुरू आहे.
जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर...
शुक्रवारी रात्री अजय जाधव यांनी आपल्या वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधून पत्नी आणि मुलगा झोपत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या वडिलांनी थेट सोनुर्लीहून गोवा गाठले. करासवाड्यातील राहत्या घरी पोहोचल्यावर अजय आणि नातू अथर्व मृतावस्थेत, तर सुवर्णा बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. या घटनेने जाधव कुटुंबीयांसह संपूर्ण परिसराला मोठा धक्का बसला.