

म्हापसा : साळगाव-बार्देश येथे बुधवारी मध्यरात्री झालेल्या दुचाकी अपघातात दोघेजण ठार झाले तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात साळगाव-पर्रा रस्त्यावर रात्री 12.30 च्या सुमारास घडला.
अपघातात मोहम्मद फराज (30 वर्षे, रा. वास्को, मूळ. उडपी, कर्नाटक) व ओमकार कारापुरकर (25 वर्षे, रा. थिवी) हे दोघेजण जागीच ठार झाले तर फराजची बहीण जुबीन सुल्ताना व दुसर्या दुचाकी वरील दिपेश पेडणेकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातावेळी फराज आणि जुबीन हे पर्रा येथून साळगावच्या दिशेने जात असता ओमकार आणि दीपेश हे दोघे साळगाव येथून पर्राच्या दिशेने जात होते. येथील रस्त्यावर आल्यानंतर दोन्ही दुचाकींत समोरासमोर धडक बसली.