

साखळी : शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये ईव्ही कनेक्टिव्हिटी करण्यासाठी कदंब परिवहन महामंडळ आणि राज्य परिवहन विभागाच्या वतीने शनिवारी साखळी येथून 4 नवीन ईव्ही बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. गोव्यातील वाहतूक पर्यावरणपूरक, स्मार्ट, बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
साखळीमध्ये 4 बसेसना सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. कदंबचे रोहन कासकर म्हणाले, पणजी-साखळी-सुर्ला, पणजी-साखळी-हरवळे, साखळी-पणजी-वेर्णा औद्योगिक वसाहत आणि पणजी-साखळी-पाई या मार्गांवर धावणार आहेत.
अधिक ‘ईव्ही’ बसेस लवकरच सुरू
सोमवारपर्यंत एकूण 14 बसेस सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी 4 बसेस डिचोली, 4 साखळी, 4 वास्को - मडगाव राष्ट्रीय महामार्गावर, 1 बस दक्षिण गोव्यासाठी, तर 1 वेळ्ळीसाठी सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अजून 11 इलेक्ट्रिक बसेसची कदंबच्या ताफ्यात भर पडणार आहे. यातील अधिकाधिक बसेस या ग्रामीण मार्गांना जोडण्यासाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कासकर यांनी दिली.