

पणजी : पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, उत्तर गोवा पणजी यांनी पणजीतील निवडणूक नोंदणी अधिकारी (बीएलओ) च्या बदल्या केल्या होत्या. त्यांच्या जागी नवे बीएलओ नियुक्त केले होते. 4 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या या नियुक्ती आदेशाला निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंत्री मोन्सेरात यांना धक्का बसला आहे.
पणजी विधानसभा मतदारसंघातील बूथ लेव्हल अधिकार्यांच्या नियुक्तीचा आदेश पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्यात येत आहे, असा आदेश पणजी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक नोंदणी अधिकारी राजेश आजगावकर यांनी शुक्रवारी काढला आहे. पूर्वीचे बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) कायम ठेवले जातील आणि एरोनेट सिस्टीममध्ये आवश्यक बदल केले जातील. नव्या बीएलओना तत्काळ त्यांच्या मूळ कार्यालयांना अहवाल द्यावा. संबंधित कार्यालयांच्या कार्यालये/विभाग प्रमुखांनी याची नोंद घ्यावी, अशी सूचनाही या आदेशात करण्यात आली आहे. पणजीतील सर्व बीएलओची बदली करून त्या जागी आपणास हवे ते बीएलओ म्हणून आणून पणजीचे आमदार बोगस मतदारांचा भरणा पणजी मतदारसंघात करू इच्छितात, असा आरोप उत्पल पर्रीकर यांच्यासह एल्वीस गोेम्स यांनी केला होता.
पणजी विधानसभा मतदारसंघातील बीएलओंच्या मोठ्या प्रमाणात बदल्यांबाबत व मतदारसंघातील बोगस तथा नेपाळी मतदार नोंदणीच्या कथित आरोपाबाबत राज्य निवडणूक अधिकार्यांनी स्पष्टीकरण केले आहे. परदेशी नागरिक, विशेषतः नेपाळी नागरिक आणि गोवा राज्यात राहत नसलेल्या व्यक्तींची मतदार यादीत नोंदणी करण्यात आली आहे, या आरोपाची चौकशी केली गेली. त्यात कुठेच नेपाळी नागरिक मतदार म्हणून नोंदणी झाली नाही. गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय शुद्ध, अचूक आणि त्रुटीमुक्त मतदार यादी राखण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. केवळ पात्र नागरिकांचीच नोंदणी केली जाईल.