

पणजी : कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांच्या गोव्यातील निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालय (इडी) ने बुधवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. लोह खनिजाच्या कथित बेकायदा निर्यातीशी संबंधित प्रकरणात हा छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्या गोव्यातील निवासस्थानावर मनी लाँडरिंग कायद्यांंतर्गत कर्नाटक, गोवा आणि मुंबईतील 15 ठिकाणांची झडती इडीच्या अधिकार्यांनी घेतली. सैल यांच्या दक्षिण गोव्यातील घरावर छापा टाकला. सतीश सैल हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बेकायदेशीरपणे उत्खनन केलेले लोहखनिज निर्यात केल्याचा आरोप सैल यांच्यावर आहे. या खनिजाची किंमत शेकडो कोटींमध्ये असून रॉयल्टी बुडविल्यामुळे सरकारचा 38 कोटींचा तोटा झाल्याचा दावा करत इडीने हा छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.