

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सक्तवसुली संचालयाने (ईडी), गोवा यांनी बँक फसवणुकीच्या एका प्रकरणात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदाअंतर्गत ७८ लाख रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. हे प्रकरण बँक ऑफ बडोदाच्या हणजूण शाखेतून सार्वजनिक निधीच्या अपहाराशी संबंधित आहे.
ईडीने ही चौकशी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी) नोंदवलेल्या 'एफआयआर'च्या आधारे सुरू केली होती. नंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणात तत्कालीन शाखा व्यवस्थापक उदित नारायण व इतरांवर आरोप आहेत.
ईडीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी संगनमत करून बँक व तिच्या ग्राहकांची फसवणूक करत अधिकृत परवानगीशिवाय खात्यांमधून निधी वळवला. तपासात असे आढळून आले की, नारायण यांनी शाखा व्यवस्थापक पदाचा गैरवापर करून संशय न येणाऱ्या ग्राहकांच्या खात्यांतून त्यात हणजूण कोमुनिदाद तसेच इतर निष्क्रिय (डॉर्मंट) खात्यांचा समावेश आहे त्यामधून रक्कम डेबिट केली.
ईडीने सांगितले की, अपहार केलेली रक्कम सहकाऱ्यांच्या 'म्यूल' खात्यांमार्फत स्तरित (लेयरिंग) करण्यात आली, ज्यामुळे निधीचा बेकायदेशीर स्रोत लपवण्यात आला. या अनधिकृत व्यवहारांसाठी बनावट स्वाक्षऱ्या आणि बेनामी सिमकार्डचा वापर झाल्याचेही तपासात उघड झाले.
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये फोंडा येथील सदाशिव प्लाझातील एक व्यावसायिक दुकान, हणजूण येथील एक भूखंड, फोंडा येथील कीर्ती रेसिडेन्सीमधील एक फ्लॅट तसेच उदित नारायण यांच्या नावावरील बँक शिल्लक यांचा समावेश आहे. ईडीने स्पष्ट केले की, या स्थावर मालमत्ता 'प्रोसीडस् ऑफ क्राइम'च्या समतुल्य मूल्याच्या असल्याने जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील एकूण गुन्हेगारी उत्पन्न २.३४ कोटी रुपये इतके असल्याचे ईडीने नमूद केले.