

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय मध्यमवर्ग हा जगातील सर्वाधिक कर्जबाजारी वर्गापैकी एक बनत चालला आहे, असा इशारा मुंबईस्थित इक्विटी रणनीतीकार आणि अर्थतज्ज्ञ सौरभ मुखर्जी यांनी दिला. त्यांच्या 'ब्रेकपॉईंट - द क्रायसिस ऑफ द मिडल क्लास अँड द फ्युचर ऑफ वर्क' या पुस्तकाच्या निमित्ताने इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
ते म्हणाले, देशात दरवर्षी सुमारे ८० लाख पदवीधर शिक्षण पूर्ण करतात; मात्र त्यांच्यासाठी पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने आर्थिक असंतुलन वाढत आहे. सोशल मीडियामुळे उंचावलेल्या जीवनशैलीच्या अपेक्षा आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे मानसिक ताण वाढत असून कर्ज घेण्याची प्रवृत्तीही झपाट्याने वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.
पांढरपेशा नोकऱ्यांतील वेतनवाढ अत्यल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१६ मध्ये वार्षिक सरासरी वेतन १०.२ लाख रुपये होते, ते २०२६ मध्ये केवळ १०.७ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे उत्पन्न आणि खर्च यामधील दरी वाढत आहे. २०२० नंतर विशेषतः आयटी क्षेत्रात ४० ते ५५ वयोगटातील व्यावसायिकांना नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
७० टक्के मध्यमवर्गीय कर्जबाजारी...
ते म्हणाले, सुमारे ७० टक्के मध्यमवर्गीयांनी कर्ज घेतले असून त्यांच्या उत्पन्नातील जवळपास ४० टक्के हिस्सा कर्जफेडीसाठी खर्च होतो. यातील निम्मी कर्जे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतली जातात, ज्यामुळे बचतीवर मोठा परिणाम होतो. उत्पादन क्षेत्रात निर्माण होत असलेल्या संधी सकारात्मक आहे. उद्योगक्षेत्रात कौशल्याधारित प्रशिक्षणावर भर वाढल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.