

पणजी : पुढारी वृत्तसेवा
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून कौतुक मिळवणे हे अत्यंत अवघड काम. त्यांना सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित लागायच्या. त्यामुळे त्यांच्यासमोर काहीतरी सादर केले तरी त्याचे कौतुक मिळेलच याची शाश्वती नसे, असे सांगत ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमान यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
'भारतातील सांगितिक थिएटर' या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समीक्षक नमन रामचंद्रन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, संगीत क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर माहिती दिली व मते मांडली.
भारतामध्ये विविध शहरात अद्ययावत सांस्कृतिक केंद्रे विकसित व्हायला हवी आहेत. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतात, असे ते यावेळी म्हणाले. हल्ली लोकांमध्ये नैराश्य वाढले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी संगीत फार मदत करते.
लोकांनी घरातून बाहेर पडून विविध प्रकारचे कार्यक्रम ऐकले पाहिजेत, संवाद साधला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. सिनेमाची संहिता व त्या सिनेमाचा अवकाश बघून प्रादेशिक संगीताचा वापर मी करत असतो.
त्यामुळे जर कधी संधी मिळाली, तर गोमंतकीय लोकसंगीताचाही वापर करेन, जर जागतिक पातळीवर आपले संगीत न्यायचे असेल, तर ते सादर करताना जागतिक साधनांचा वापर केला पाहिजे; पण त्याचा आत्मा हा प्रादेशिक संगीताचा असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील (छत्रपती संभाजीनगर येथील) अंजली गायकवाड हिचे नाव घेत त्यांनी तिचे कौतुक केले.
यावेळी तरुण पिढीमध्ये खूप क्षमता आहे. ती योग्य पद्धतीने वापरली तर सर्वोत्तम कलाकृती बनू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.