

पणजी : परराज्यांतून येऊन गोव्याच्या हद्दीत मासेमारी करणार्या मच्छीमारी ट्रॉलर्सवर व बुल ट्रॉलरिंगवर नजर ठेवण्यासाठी मत्स्योद्योग खाते आता ड्रोन कॅमेर्यांचा वापर करणार आहे. एप्रिल महिन्यात याची ट्रायल घेण्यात आली आहे. हे ड्रोन 20 कि.मी. दूरवरून माहिती उपलब्ध करतील व त्यानंतर लगेच मत्स्योद्योग खाते गस्तीनौैका किनारी पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करतील, अशी माहिती मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार रेजिनाल्ड यांनी राज्यात बुल ट्रॉलिंगद्वारे व परराज्यांतील ट्रॉलरद्वारे मासेमारी होत असल्याचा दावा करून मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन फक्त पाहणी करणार की कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री हळर्णकर म्हणाले, मागील वर्षभरात 13 ते 14 बाहेरील ट्रॉलर्सना पकडले होते. त्या ट्रॉलर्समधील मासळीच्या किमतीपेक्षा पाच पटीने दंड त्यांना आकारला गेला.
आता नव्या उपक्रमांत सुरू केले जाणारे ड्रोन पणजीतून ऑपरेट केले जातील. मत्स्योद्योग खात्याच्या दोन गस्ती नौका आहेत. सोबत किनारी पोलिस आहेत. त्यांच्या सहकार्याने कारवाई केली जाते. या प्रश्नावरील चर्चेत आमदार नीलेश काब्राल, युरी आलेमाव, विजय सरदेसाई व डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भाग घेऊन विविध सूचना केल्या.