

मडगाव : मडगाव शहरात शुक्रवारी भरदिवसा एका नामवंत डॉक्टरचे कथित अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि एका महिलेने संबंधित डॉक्टरांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास संबंधित डॉक्टर मडगाव येथील आपल्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना दोन पुरुष आणि एका महिलेने त्यांना अडविले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने इमारतीबाहेर आणून एका कारमध्ये बसविण्यात आले. या संपूर्ण घटनेचे चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित डॉक्टर संशयितांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मदतीसाठी आरडाओरडा करूनही संशयितांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून काही क्षणांत तेथून पलायन केले.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांच्या पत्नीने आणि नातेवाईकांनी मडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण गावस-देसाई यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
तपासासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, घटनास्थळासह परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा मार्ग, संशयितांची ओळख तसेच या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी विविध अंगांनी तपास सुरू आहे.
कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेमुळे मडगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरदिवसा एका नामवंत डॉक्टरचे कथित अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मडगाव पोलीस करीत असून, अपहरणामागील नेमके कारण आणि संशयितांची ओळख लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.