

पणजी : आई-वडिलांच्या भांडणामुळे लहान मुलांवर काय प्रसंग ओढवतात, त्याची प्रचिती गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयात निदर्शनास आली. न्यायमूर्तींनी या प्रकरणाला योग्य न्याय दिला. मुलाला आपल्या पित्याच्या घरी दिवाळी साजरी करायला मिळाली. आता मोठ्या दिवाळी संदर्भातील प्रश्न मंगळवारी (दि.12) सोडवला जाण्याची शक्यता आहे.
आई मुस्लिम आणि वडील हिंदू असून, दोघेही 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. सध्या त्याचा ताबा आईकडे आहे. दोघांमध्ये घटस्फोटासाठीची सुनावणी चालू आहे तसेच मुलाचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून दोघांचा दावा आहे, यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दिवाळीपूर्वी त्या मुलाच्या वडिलाने उच्च न्यायालयात अर्ज केला आणि दिवाळीची सुट्टी त्याने आपल्या आजी-आजोबांसोबत घालवण्यासाठी मुलाचा ताबा मागितला. विरोध करण्यासाठी मोठमोठे वकील गोव्याबाहेरून आले. शेवटी न्यायमूर्तींनी तोडगा काढला आणि एका दिवसासाठी मुलाला दिवाळीला पाठवले, तेही त्या आईच्या वकिलासोबत. वकीलही सकाळी ते रात्री 9 पर्यंत तेथे राहून मुलाला परत घेऊन आले.
आता प्रश्न आहे मोठ्या दिवाळीचा. मुलाने या दिवाळीला यायचे कबूल केले आहे. त्याला आपल्या धर्मातील सण-प्रथा समजल्या पाहिजेत, असे वडिलांचे म्हणणे; तर मुलाला बिघडवून आईविरुद्ध करण्याची ही चाल आहे, असा तिचा आरोप. आता सदर प्रकरणावर मंगळवारी सुनावणी असून, या निकालाकडे ‘त्या’ मुलाचेच नव्हे, तर अनेकांचे डोळे लागून राहिले आहेत.