

पणजी : समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे मांडवी नदीचा प्रवाह वाढला आहे. यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून दिवाडी-जुने गोवे या दरम्यानची फेरीबोट सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव ही सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली. परिणामी, दिवाडी बेटावरील नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार व व्यापार्यांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. फेरीसेवेच्या तात्पुरत्या बंदीबाबत प्रशासनाने स्पष्ट केले की, पाण्याची पातळी स्थिर झाल्यानंतर सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.