Yuri Alemao| भाजपकडून लोकांच्या भावनांचा अनादर
मडगाव : पुढारी वृत्तसेवा
पोप जॉन पॉल-३ यांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यास भाजपचे डबल इंजीन सरकार अयशस्वी झाले असून हा लोकांच्या भावनांचा अनादर आहे. भाजप सरकारने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या दहावार्षिक शवप्रदर्शनासाठी केंद्र सरकारकडे ३०० कोटी रुपयांचे अनुदान मागितले होते.
ते मंजूर केले की नाकारले गेले हे राज्यातील जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना २०२३ मध्ये पत्र करून लोकांच्या भावना त्यांना कळवल्या होत्या. तरीही भाजप सरकारला पोप यांना आमंत्रित करता आले नाही.
फेब्रुवारी १९८६ मध्ये पोप जॉन पॉल ३ यांची गोव्याला झालेली शेवटची भेट होती. यंदा शवप्रदर्शन सोहळ्यात पोप यांचा सहभाग असावा अशी लोकांची इच्छा आहे. १९८६ च्या स्मृतींना उजाळा मिळाला असता, असे सांगून आलेमाव यांनी खंत व्यक्त केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी युरी आलेमाव लोकभावनांचा आदर करून पोप यांच्या प्रवास दौऱ्यात गोव्याचा समावेश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे आवाहन आपण केले होते. पोप यांचे दर्शन होणार याचा उत्साह ख्रिस्ती बांधवांमध्ये पसरला होता. परंतु भाजपची दोन्ही इंजिने लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत.
शवप्रदर्शन 'उच्चाधिकार'ची बैठक
लोकांच्या विनंतीचा मान ठेवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या डबल इंजीन सरकारने पोप यांना गोवा राज्याला भेट देणे शक्य व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. शवप्रदर्शन उच्चाधिकार समितीची तातडीने बैठक घेऊन या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.
वारसा स्थळावरील प्रकल्प रद्द करा
जुने गोवेतील वारसा स्थळांचे संरक्षण करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. सेव्ह ओल्ड गोवा कृती समितीने केलेल्या सूचना विचारात घेण्याबरोबर मास्टर प्लॅन जाहीर करण्यात यावा. तसेच जागतिक वारसा स्थळावर येणारे प्रकल्प रद्द केले जावेत, अशी मागणीही आलेमाव यांनी केली आहे.

