

पणजी : डिचोली पोलिस स्थानक हे देशातील पाचवे उत्कृष्ट पोलिस स्थानक ठरले आहे. केंद्रीय गृह खात्याने 2025 मधील देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात त्याचा समावेश केला आहे. गोवा पोलिस आणि गृह खात्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
तत्कालीन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. तसेच पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा शिताफीने तपास करणे आदी निकषांवर उत्कृष्ट पोलिस स्थानकांची निवड केली जाते. या सर्व निकषांमध्ये डिचोली स्थानक पात्र ठरले. गेल्या सहा महिन्यांत पोलिस स्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये मुलांसाठी अनुकूल खोली, जिम, कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार कॅटिन, स्वच्छ बॅरेक इत्यादींचा समावेश केला आहे.