

फोंडा /मडगाव : प्रतापनगर-धारबांदोडा येथील झालेला रोशनी मोजेस हिचा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी संशयित संजय केविन याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू ते गोवा या दरम्यान झालेल्या प्रवासादरम्यान बसमध्ये संजय व रोशनी यांच्यात भांडण सुरू होते. मात्र, या भांडणाचा त्रास इतर प्रवाशांना होऊ लागल्याने बस वाहकाने दोघांनाही प्रतापनगर येथे उतरवले होते. त्यानंतर दोघेही चालत रानाच्या दिशेने गेले. त्याठिकाणी रोशनीने संजयची माफीही मागितली. मात्र, संशयाच्या भुताने पछाडलेल्या संजयने बेसावध असणार्या रोशनीच्या गळ्यावर वार करून तिला ठार मारले. शवचिकित्सा अहवालात रोशनीचा मृत्यू गळा चिरल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संजयने तिला ठार मारण्याची पूर्व तयारी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. कारण रोशनी बेसावध असताना संजयने तिच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केला असून त्यासाठी वापरले शस्त्र त्याने बेंगळुरू येथून तिला ठार मारण्यासाठीच आणले असावे, अशी शंका पोलिसांना आहे. जर तिला ठार मारण्याचा त्याचा इरादा नव्हता तर तो धारधार शस्त्र का घेऊन आला होता, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
पाच वर्षांपासून प्रेम संबंध असलेल्या रोशनीचे अन्य कोणाशी सूत जमल्याच्या संशयाने पछाडलेल्या संजयने तिला संपवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्याने तिला गोव्यात येण्यासाठी राजी केले होते. तो फक्त संधीची वाट पाहत होता. ती संधी त्याला बेंगळुरू-गोवा असा प्रवास करणार्या त्या बसच्या वाहकाने दिली. त्यांच्या प्रेमाची चाहूल त्यांच्या कुटुंबीयांना लागली होती. त्यामुळे रोशनीच्या घरात त्याचे पडसाद उमटू लागल्यामुळे रोशनीने संजयला भेटण्याचे कमी केले होते. ती आपल्याला टाळत असल्याचा गैरसमज निर्माण झाल्यामुळे त्यांच्या दोघांच्याही नात्यात दुरावा आला होता. गोव्याच्या वाटेवर असताना त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला होता. त्याचा त्रास इतर प्रवाशांना होऊ लागल्यामुळे बस वाहकाला त्या दोघांनाही वाटेत उतरावे लागले. दरम्यान, रोशनी हिचा मृतदेह तिच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला असून तिच्यांवर गुरुवारी 19 रोजी लिंगराजपूरम-बंगळूरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
कोणाला संशय येऊ नये म्हणून संजय रोशनीला घेऊन एक दिवस हुबळी येथे राहिला होता. त्यानंतर आंतरराज्य बस पकडून दोघेही गोव्यात दाखल झाले होते. त्यामुळे हुबळी ते वास्तव्याला असणार्या हॉटेल व्यवस्थापकाचाही जबाब नोेंदविण्यात येणार आहे.