

डिचोली : रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे बना आणि आत्मनिर्भर तसेच विकसित गोवा घडविण्यात आपले योगदान द्या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. उद्योग, व्यापार व वाणिज्य संचालनालयाच्या वतीने आयोजित पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम : नवीन संधी (पीएमईजीपी) या उद्योग संगम कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पीएमईजीपी योजनेच्या लाभार्थीचा सत्कार केला.
महिला तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांचा वाढता सहभाग हा सर्वसमावेशक विकासाचा सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पीएमईजीपी, आरएएमपी आणि स्वयंपूर्ण गोवा यांसारख्या विविध योजनांद्वारे उद्योजकांना आर्थिक साहाय्य, कौशल्य विकास, बाजारपेठेशी जोडणी आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे गोव्यातील एमएसएमई क्षेत्र अधिक सक्षम व मजबूत होत आहे.
१,३२० सूक्ष्म, लघु उद्योग उभारले
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) हा युवकांच्या आकांक्षा उद्योगांमध्ये रूपांतरित करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. या योजनेंतर्गत गोव्यात आतापर्यंत १,३२० हून अधिक सूक्ष्म उद्योग उभारण्यात आले असून, सुमारे १०० कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित करण्यात आले आहे. तसेच ३४.८२ कोटी रुपयांचे मार्जिन मनी अनुदान देण्यात आले असून जवळपास १२ हजार लोकांसाठी रोजगारनिर्मिती झाली आहे.