

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
पावसामुळे दक्षिण गोव्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत तब्बल ७१ जणांची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यापूर्वी जुलै महिन्यात ९१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे दक्षिण गोव्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष न करता तातडीने डेंग्यूची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले आहे.
पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढते.
घरांच्या परिसरातील भांडी, कुंड्या, टाकाऊ वस्तू, जुने टायर तसेच इतर ठिकाणी साचलेले पाणी डेंग्यूच्या डासांच्या पैदासीसाठी पोषक ठरते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढला असून नागरिकांनी घराबरोबरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचत असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढते. घरांच्या परिसरातील भांडी, कुंड्या, टाकाऊ वस्तू, जुने टायर तसेच इतर ठिकाणी साचलेले पाणी डेंग्यूच्या डासांच्या पैदासीसाठी पोषक ठरते. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचा धोका वाढला असून नागरिकांनी घराबरोबरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जून महिन्यात दक्षिण गोव्यात डेंग्यूचे ३१ रुग्ण आढळले होते. त्यापैकी २९ रुग्णांना इस्पितळात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यानंतर जुलैमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. जुलै महिन्यात ९१ जणांची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली असून ७९ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
जुलै महिन्यातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यापूर्वीच ऑगस्टच्या सुरुवातीला डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. अवघ्या दहा दिवसांत ७१ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. यातील २७ रुग्ण सध्या इस्पितळात उपचार घेत आहेत.
दरम्यान, डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धूरफवारणी तसेच डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सुरू करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घराघरांत जाऊन डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत माहिती देऊन परिसरात पाणी साचू न देण्याच्या सूचनाही करण्यात येत आहेत.