

पणजी : गोव्यात मराठीला हजारो वर्षाचा इतिहास आहे. येथील संस्कृती व परंपरा जपण्याचे काम मराठी भाषेने केले आहे. त्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळणे, हा तिचा हक्क आहे. गोव्यातील मराठीप्रेमींनी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रसंगी बलिदान देण्यास तयार रहावे. राजकारण्यानी मराठीबाबत विचार करावा, यासाठी मराठी व्होटबँक तयार करायला हवी. येत्या दोन वर्षात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देऊनच स्वस्थ बसू, असा निर्धार शिक्षण तज्ञ व मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केला. ते सोमवारी (दि.३१) पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित मराठीप्रेमींच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.
अनेक वर्षानंतर आयोजित या मराठी राजभाषेच्या मागणीसाठीच्या निर्धार मेळाव्याला अपूर्व असा प्रतिसाद लाभला. सभागृहाबाहेरही अनेक मराठीप्रेमींनी गर्दी केली होती. मराठी राजभाषा झाली पाहिजे, असा जोरदार जयघोष यावेळी उपस्थितांनी केला. पुढे बोलताना प्रा. वेलिंगकर म्हणाले, हा निर्धार मेळावा ही चाचपणी होती. मात्र त्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभला व पुढील लढ्याचे चित्र स्पष्ट झाले. ४० वर्षे मराठीवर जो अन्याय झाला आहे. तो यापुढे सहन केला जाणार नाही. आता माघार नाही, ही आरपारची लढाई आहे. निकराची लढाई लढू पण मराठीला राजभाषा करूच, असेही प्रा. वेलिंगकर यावेळी म्हणाले.
काँग्रेसने गोव्यात मराठीवर अन्याय केला. तेच काम भाजप करत आहे. सहनशीलतेचा कडेलोट होईपर्यंत आम्ही गप्प राहू शकत नाही. २०२७ ची विधानसभा निवडणूक ही आपल्या या लढ्याची कालमर्यादा आहे. मराठी व्होट बँक तयार करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही प्रा. वेलिंगकर म्हणाले. यावेळी मराठी राजभाषा प्रस्तापण समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर, गोमंतक मराठी अकादमीचे प्रदीप घाडी आमोणकर, मराठीप्रेमी गुरुदास सावळ, प्रकाश भगत, मच्छींद्र च्यारी, प्रा.गजानन मांद्रेकर, डॉ. अनुजा जोशी, नेहा उपाध्ये, सागर जावडेकर, प्रा.पौर्णिमा केरकर, डॉ.गोविंद देव, नितीन फळदेसाई, प्रा. आत्माराम गावकर, देवीदास आमोणकर, रमेश नाईक, तुषार टोपले आदी उपस्थित होते.
भारतीय भाषा नसलेल्या रोमी कोकणीला मराठीसोबत राजभाषा करा, अशी मागणी होत आहे. आम्ही रोमीला पाठिंबा देणार नाही. हे कारस्थान आहे, असेही प्रा. वेलिंगकर म्हणाले.
ज्या मराठी भाषेने आम्हाला संस्कारांचं आणि राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजलं. त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान भविष्यात सहन करणार नाही. मराठीला राजभाषेचे स्थान मिळवूनच देऊ, अशी प्रतिज्ञा शेकडो मराठीप्रेमींनी निर्धार मेळाव्यात केली.