

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सर्वण - कारापूर येथील अभिनंदन लोढा यांच्या 'वन गोवा' प्रकल्पाशी संबंधित कथित खंडणीप्रकरणात मुंबई पोलिसांच्या खंडणी प्रतिबंधक विभागाने दोघांना दोडामार्ग (महाराष्ट्र) येथून अटक केली आहे. या प्रकरणी सिद्धेश तरी व प्रितेश साळगावकर यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून काँग्रेस व आपने सखोल चौकशीची मागणी केली आहे.
सर्वण - कारापूर आंदोलकांना अटक केलेल्या मुंबई पोलिसांच्या कथित कारवाईवर आप गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांना सामील न करता किंवा योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करापूरच्या आंदोलकांना उचलून दोडामार्ग आणि नंतर मुंबईला नेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
या आरोपांची कायद्यानुसार चौकशी झाली पाहिजे आणि 'आप' करापूरच्या आंदोलकांच्या पाठीशी उभी राहील व त्यांना घाबरवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबई पोलिसांनी सर्वण - कारापूर येथील आंदोलकांना कथितरीत्या ताब्यात घेतल्याच्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या कारवाईची गोवा पोलिस आणि राज्य सरकारला माहिती होती का किंवा त्यांनी या कारवाईला अधिकृत परवानगी दिली होती का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी करत आरोपांची निष्पक्षपणे तपासणी झाली पाहिजे आणि लोकशाही विरोधाला दडपण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मत व्यक्त केले आहे.