

पणजी (पुढारी वृत्तसेवा):
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या (डी डीएसवाय) लाभार्थ्यांच्या मानधनात दरमहा ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग आणि तृतीयपंथी व्यक्तींना आता दरमहा दोन हजार रुपयांऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत. तर, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे.
तसेच, ५० वर्षांवरील मोटारसायकल पायलटला दरमहा दोन हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. समाज कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी गुरुवारी मानधनवाढीची अधिसूचना जारी केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलीकडेच डीडीएसवायसह गृह आधार योजनेच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार समाज कल्याण खात्यांतर्गत राबवण्यात येणाऱ्या डीडीएसवाय योजनेचे मानधन वाढवण्यात आले आहे.
गृह आधार योजना महिला व बालकल्याण खात्यातर्फे राबवली जाते. राज्यातील निवासी असलेल्या विधवा, दिव्यांग, तृतीयपंथी व्यक्ती आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना डीडीएसवाय योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत सध्या दरमहा दोन हजार रुपये मानधन दिले जात होते. ते आता अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. राज्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची एकूण संख्या सुमारे एक लाख २० हजार आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग आणि तृतीयपंथी : दरमहा २५०० रुपये
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक : दरमहा ३००० रुपये
५० वर्षांवरील मोटारसायकल पायलट : दरमहा २००० रुपये आर्थिक मदत
एकूण लाभार्थी संख्या : सुमारे १ लाख २० हजार