

पणजी: पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष म्हणून दयानंद कारबोटकर व दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर यांची नियुक्ती जवळजवळ नक्की मानली जात आहे. भाजपाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी आज (दि.१०) अर्ज भरण्याची तारीख होती. मात्र, दोन्ही ठिकाणी प्रत्येक एकमेव अर्ज आलेला असल्यामुळे दोघांची निवड नक्की मानली जाते. आज रात्री किंवा उद्या शनिवारी या दोघांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. (BJP Goa)
कारबोटकर हे मये मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तर प्रभाकर गावकर सांगे मतदारसंघातील भाजपचे युवा नेते व भाजपाच्या एसटी मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदासाठी म्हापसा येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रुपेश कामत व राजसिंह काणे तसेच दयानंद कारबोटकर हे तीन जण, तर दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदासाठी प्रभाकर गावकर यांच्यासह मडगाव येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सर्मद पै रायपूरकर व वास्को येथील माजी नगराध्यक्ष दीपक नाईक इच्छुक होते. मात्र, सहमती होऊन उत्तर गोव्यातून दयानंद कारबोटकर व दक्षिणेतून प्रभाकर गावकर यांची नावे नक्की झाली आणि त्यांनी आज अर्ज दाखल केले. (BJP Goa)
प्रदेशाध्यक्षपदी कोण?
भाजपाच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेत बूथ समित्या निवडीनंतर मंडळ अध्यक्ष निवडण्यात आले होते. आता दोन्ही जिल्हा अध्यक्षांची निवड जवळजवळ नक्की झाली आहे. त्यामुळे आता प्रदेश अध्यक्षपदी कोणाची निवड होते. याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनाच 2027 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी अनेक मंत्री आणि आमदारांनी केली आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री दिलीप परुळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे प्रदेश अध्यक्षपदी नेमकी कुणाची निवड होते, हे येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.