

सासष्टी : राज्यात मागील 8 वर्षांपूर्वी गाजलेल्या राजबाग-काणकोण येथील ब्रिटीश युवती डॅनियल मॅकाग्लिन हिच्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला विकट भगत (वय 31) याला दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी शुक्रवारी भारतीय न्यायसंहितेच्या खून 302, बलात्कार 376 व पुरावे नष्ट करणे, 201 कलमान्वये दोषी ठरविले आहे. आरोपीला सोमवार, दि. 17 रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी आरोपीला दोषी ठरविल्यानंतर सरकारी पक्ष व प्रतिवादी पक्षाच्या वकिलांना आरोपीला शिक्षा सुनावण्यापूर्वी युक्तिवाद करण्याचे फर्मान दिले.त्यावर सरकारी वकिल देवेंद्र कोरगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, ही बलात्कार व खुनाची घटना गंभीर स्वरूपाची असून आरोपीने केलेले कृत्य बघितल्यास देशात कुठेच महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येते. तेव्हा आरोपीला सर्वांत जास्त फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. तर प्रतिवादीचे वकिल अरुण ब्राज डिसा यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात एकाही प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतलेली नसून आपल्या अशिलाला परिस्थितीजन्य पुराव्यांवर दोषी ठरविण्यात आलेले आहे. तसेच आपले अशिल तरूण असून त्याचे पुढे भवितव्य आहे. त्यामुळे न्यायालयाने आपल्या अशिलाला दया दाखवून कमीत कमी शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
बलात्कार व खुनाची ही घटना 14 मार्च 1017 रोजी घडली होती. त्यानंतर काणकोण पोलिसांनी जलद गतीने ब्रिटिश युवतीच्या खुनाचा तपास लावून आरोपीला अटक केली होती. त्या दिवसापासून आरोपी कोलवाळच्या तुरुंगात आहे. 28 वर्षीय ब्रिटीश युवती 2016 मध्ये गोव्यात पाळोळे किनार्यावर आली होती. त्यावेळी तिची किनार्यावरच आरोपीशी ओळख झाली होती. नंतर त्यांच्या मैत्रीचे कधी प्रेमात रुपांतर झाले हे एकमेकांना कळलेच नाही. ती दोघे एकमेकांना प्रेमी युगुल मानत होते, त्याच संबंधाने वागत होते. त्यावेळी ब्रिटिश युवती व्हिसा संपल्याने आपल्या देशात गेली. आपण दुसर्या वर्षी येऊन आरोपीशी लग्न करणार आणि त्यानंतर त्याला घेऊन ब्रिटनला घेऊन जाणार असे आश्वासनही ब्रिटीश युवतीने आरोपीला दिले होते.
ब्रिटीश युवती 2017 मध्ये गोव्यात येऊन तिने आश्वासनपूर्ती केली. नंतरच्या काळात ब्रिटीश युवती मागच्या वर्षीप्रमाणे आपला प्रियकर आरोपी सोबत फिरू लागली. पाळोळे किनार्यावरील लोक त्यांना देश-विदेशी प्रेमीयुगुल म्हणून ओळखत होते. दिवसभर किनार्यावर समुद्रस्नान करून रात्रीच्यावेळी मद्यपानाच्या पार्ट्या करणे त्यांचा नित्याचाच कार्यक्रम होता. 13 मार्च 2017 च्या मध्यरात्री ब्रिटिश युवती व आरोपी बीयरच्या बाटल्या व पार्टीचे सामान घेऊन राजबाग येथे निर्जनस्थळी गेली. तिथे बसून दोघांनी भरपूर मद्यप्राशन केले. त्यानंतर आरोपीने दारूच्या नशेत आपल्या ब्रिटिश प्रेयसीशी शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिच्याशी हुज्जत घातल्याने दोघांची झटापट झाली. अखेर आरोपीने ब्रिटिश प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. बियर बॉटल्सचा तिच्या डोक्यावर प्रहार केला. 14 मार्च रोजी सकाळी राजबाग येथे ब्रिटीश युवतीचा रक्तबंबाळ, नग्नावस्थेत मृतदेह सापडला होता.
राज्यात एकेकाळी गाजलेले व संवेदनशील ठरलेल्या या बलात्कार व खून प्रकरणाची सुनावणी ऐकण्यासाठी ब्रिटनहून मयत युवती डॅनियल मॅकाग्लिन हिची आई, बहिण व कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविल्याचा निवाडा ऐकून त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. नंतर त्यांचे कुटुंबीय न्यायालयाच्या बाहेर येऊन अश्रूपूर्ण नयनांनी पत्रकारांना सांगितले की, सत्य कधीच लपत नसते. आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. आणि न्यायालयाच्या निवाड्यावर आपण समाधानी आहोत. आम्हाला न्याय मिळाला पण आमची सोन्यासारखी मुलगी आम्ही गमावली याचे दुःख होते.
काणकोण पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक फिलोमिन कोस्ता यांनी प्रथम खून प्रकरणाचे तपासकाम करून आरोपीला गजाआड केले होते. नंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी तपासकाम पूर्ण करून न्यायालयात आरोपी विरूद्ध 500 पानी आरोपपत्र दाखल केले होते.
सरकारी पक्षतर्फे बलात्कार व खुनाच्या या प्रकरणात एकूण 46 साक्षीदारांच्या जबान्या न्यायालयाने नोंदवून घेतलेल्या आहेत. तसेच या प्रकरणात काणकोण पोलिसांनी आरोपी विरुद्ध एकूण 500 पानांचे आरोप पत्र न्यायालयात सादर केले होते.